महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा ! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला पहिला छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अनादी मी अनंत मी’ या राज्यगीतला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
फ्रान्समधील मार्सेलिन येथील समुद्र किनाऱ्यावरून या पुरस्काराची घोषणा करताना आशिष शेलार म्हणाले की, पहिला “छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत” पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी… ” या अमर प्रेरणा गीताला दिला जात आहे. आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा पुरस्कार देत आहोत. कारण ते महानयोध्दे, कुशल प्रशासक, पराक्रमी तर होतेच तसेच ते कवी मानाचे आमचे राजे होते. म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.


ज्या पद्धतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे “छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत” पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभुषण’ हा ग्रंथ लिहिला होता. तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले होते. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी ८ जुलै १९१० या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे “अनादी मी … अनंत मी.. हे गीत होय”, असं आशिष शेलार म्हणाले. लवकरच समारंभ पुर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here