तुम्ही कामात कितीही व्यग्र असलात तरीही दीर्घकाळ एकाच जागी बसून राहण्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी छोटासा ब्रेक घेणेही महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने आपल्याला अनेकदा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी कामादरम्यान झटपट चालायला सांगितले जात असते. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यानंतर अनेकदा मधे मधे उठून चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, चालण्यापेक्षा स्क्वॅटिंग अधिक प्रभावी ठरू शकते.
जास्त वेळ बसल्याने सायटिका, स्नायुशोष, गुडघेदुखी, टाईप-२ मधुमेह व कार्पल टनेल सिंड्रोमदेखील होऊ शकतो. म्हणूनच कामादरम्यान वारंवार विश्रांती घेणे आणि चालणे किंवा स्क्वॅटिंगसारख्या क्रियाकलापांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. अधिक वजन, लठ्ठपणा, मधुमेह, हायपरटेन्शन मेलिट्स व कार्डिव्ह रोग होण्याचे प्रमुख कारण म्हणजे एका ठिकाणी भरपूर वेळ बसणे. डॉ. कुमार यांच्या मते, आधुनिक जीवनशैली, तसेच कामासाठी दीर्घकाळ बसणे आवश्यक ठरते. त्यामध्ये काहींना दररोज ८ ते १२ तास किंवा त्याहूनही जास्त वेळ बसून काम करावे लागते. मात्र, यातूनही थोडा वेळ काढून चालणे किंवा स्क्वॅट्ससारखे व्यायाम केल्यास वजन वाढणे, अन्य शारीरिक विकारांचा धोका कमी होतो.
अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, स्क्वॅटिंगद्वारे खालच्या अंगांचे स्नायू सक्रिय होण्याची तीव्रता जास्त असते. स्क्वॅटिंग आणि चालणे तितकेच फायदेशीर असले तरी लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यासाठी स्क्वॅट्स जास्त उपयुक्त ठरतात. विशेषतः त्यामध्ये तुमच्या मुख्य स्नायूंना लक्ष्य केले जाते आणि त्यामुळे स्क्वॅट्स जास्त फायदेशीर आहेत, असे डॉ. खत्री यांनी स्पष्ट केले. मात्र, स्क्वॅट्स करणे नेहमीच विशेषतः कार्यालयीन वेळेत किंवा घराबाहेर असताना शक्य होऊ शकत नाही. अशा वेळी चालणे हा सर्वांत सोपा; पण प्रभावी पर्याय आहे. तुमच्या ऑफिसच्या परिसरात किंवा घराभोवती नियमित फिरण्यामुळे एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते.