सध्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची अधिक चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीय. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील, लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे आणि जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.
जिल्ह्यात मागील काही काळापासून चुकीचे पायंडे पडले आहेत. ते आधी बंद करा. मला बेशिस्त काम चालत नाही. तुमच्यावर दबाव आणून कोणी चुकीचं काम करून घेत असतील तर मला सांगा. मी उपलब्ध आहे. मात्र चुकीचं काम खपवून घेतलं जाणार नाही. असा दम पालकमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्ह्याची बदनामी थांबवून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. जिल्ह्यात नैसर्गिक संपदा मोठ्या प्रमाणावर आहे , विकास प्रकल्पांसाठी त्याचा फायदा होईल. मुंबई बीड रेल्वे सुरू करण्यासंदर्भात मी प्रयत्न करणार आहे. असंही ते म्हणाले.
तीन तासांच्या बैठकीत अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत कुठेही भाष्य केलं नाही. बैठकीनंतर माध्यमांशी न बोलता त्यांचा ताफा हेलिपॅडकडे रवाना झाला.