शनि शिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्याच्या कारणावरुन काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण देवस्थानने दिलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांचा दबाव होता. शनि देवाच्या चौथऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरु झाला होता. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून टाकावे अन्यथा १४ जून रोजी संपूर्ण हिंदू समाजाकडून मंदिराबाहेर मोठी रॅली काढली जाईल असा इशारा देण्यात आला होता.
मुस्लिम कर्मचाऱ्यांना हिंदू मंदिर परिसरात किंवा संबंधित संस्थांमध्ये काम करण्याची परवानगी का दिली जात आहे अशी विचारणा या संघटनांकडून केली जात होती. मुस्लिम मांसाहार करतात आणि मंदिरात येतात असा त्यांचा आक्षेप होता.