एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून “ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी”ने शिर्डीसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाले आहेत. शिर्डीत साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह इतरांची १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलं असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
शिर्डी आणि परिसरातील २१ गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. २१ गुंतवणुकदारांची १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.