मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येमध्ये सहभागी असलेल्या कृष्णा आंधळेचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली. तेव्हापासून कृष्णा आंधळे गायब आहे. त्यामुळे त्याच्या जिवंत असण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनीच याबाबत मोठं विधान केलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलीस आणि सीआयडीकडून घेतला जात आहे. कृष्णा आंधळेकडे मोबाईल होता. तो त्याने नष्ट केल्याचा दावाही पोलिसांकडून केला गेला आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनीच तो जिवंत आहे की नाही याबद्दल शंका असल्याचे म्हटले आहे.
कृष्णा आंधळेबद्दल मंत्री शिरसाट काय बोलले?
संजय शिरसाट म्हणाले, “मला शंका आहे की, कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही. कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करत आहेत, सगळ्या टीम जाताहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही. त्यामुळे शंका व्यक्त करता येऊ शकते. परंतु त्याचा तपास तातडीने केला पाहिजे.” “बीडचे पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या सर्व टीम पाठवल्या आहेत. महाराष्ट्रातील बाकीच्या टीमही त्याच्या मागावर आहेत. मग तपास न लागण्याचं कारण काय, हे थोडं गुलदस्त्यात आहे. म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की, त्याचा खून झाला की काय? अशी शंका मला आहे”, असे शिरसाट यांनी सांगितले.