नांदेडमध्ये बदलापूर घटनेची पुनरावृत्ती! शाळेत 10 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार!

बदलापूर घटनेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर शाळेतही विद्यार्थी सुरक्षित नसल्याचं समोर आलं. आता नांदेडमधून अशीच संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतील एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला आहे.

शाळेत सेवकाने चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. शहरातील प्रसिद्ध ज्ञानमाता विद्या विहार शाळेत गुरुवारी (6 मार्च) दुपारी प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थ्यांने या घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. त्यानंतर त्याच्या पालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीचे नाव सबसिंग मच्छल (वय 50) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालटेकडी बायपास रोडवर असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. याच शाळेत 50 वर्षीय सबसिंग मच्छल हा सेवक म्हणून काम करतो. गुरुवारी दुपारी शाळा सुटण्यापूर्वी चौथीत शिकत असलेला 10 वर्षाचा विद्यार्थी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळल्यानंतर त्याने क्रिकेट किट स्टोअर रूममध्ये ठेवण्यासाठी गेला असता सेवकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. शाळा सुटल्यानंतर एका महिला शिक्षिकेला तो बालक घाबरलेल्या अवस्थेत रडत असल्याचे निदर्शनास आले. शाळा सुटल्यानंतर त्याने आपल्या आईला घटनेची माहिती दिली.

त्यानंतर आई वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही माहिती दिली. पोलीसांनी नराधम सेवक साबसिंग मच्छल याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकाकडून संताप व्यक्त केला जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांवर होत असलेला लैंगिक अत्याचार ही विद्यार्थ्यांसाठी गंभीर बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here