मुंबईतील पारले ग्रुप Parle-G, मोनॅको आणि इतर ब्रँडच्या नावे बिस्किटांचं उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. मुंबईतील कंपनीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. सकाळपासून ही कारवाई केली जात आहे. आयकर विभागाच्या फॉरेन असेट युनिट आणि मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंगच्या वतीने ही कारवाई केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, करचोरी प्रकरणात पारले ग्रुप आयकर विभागाच्या निशाण्यावर आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. छापेमारी पूर्ण झाल्यानंतर याबद्दल अधिक माहिती मिळेल. सध्या आकर विभाग कागदपत्रांची छाननी करण्यात व्यग्र आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पारले-जी बिस्किटने 2023-24 या आर्थिक वर्षात चांगला नफा कमावला. हा नफा FY24 मध्ये दुप्पट होऊन 1,606.95 कोटी झाला आहे, जो FY23 मध्ये 743.66 कोटी होता. गेल्या आर्थिक वर्षात पारले बिस्किटाचे परिचालन उत्पन्न दोन टक्क्यांनी वाढून 14,349.4, कोटी रुपये झाले आहे. महसुलाबद्दल बोलायचं गेल्यास तो 5.31 टक्क्यांनी वाढून 15,085.76 कोटी रुपये झाला आहे.