मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली असून सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे. यादरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर लढणार अशी चर्चा होताना दिसत आहे. यासाठी भाजपाने चाचपणी देखील सुरू केल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी याबद्दल भाष्य केले आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा स्वतंत्र उमेदवार उभे करणार का? की महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जाईल याबद्दल फडणवीस यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत फडणवीस म्हणाले की, “शंभर टक्के महायुती मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवेल, भाजपा वेगळी लढणार नाही आणि मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार.”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कसलेही मतभेद नाहीत, माध्यमांना बातमी मिळत नाही तेव्हा अशी बातम्या तयार केल्या जातात. आम्ही तिघेही एकत्र मिळून राज्य चालवत आहोत आणि चांगले काम कत आहोत. देवेंद्र फडणवीस हे मनीकंट्रोल ग्लोबल वेल्थ समिट २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.