पुणे तेथे गुन्हेगारीला काय उणे! भर रस्त्यात लघुशंका करुन तरुणाचे अश्लील चाळे

पुण्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आलिशान बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने रस्त्यातच लघुशंका केली. यानंतर स्थानिकांनी जेव्हा या युवकाला हटकले, तेव्हा युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणे नगर मार्गावर असलेल्या शास्त्रीनगर चौकात ही संतापजनक घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिग्नलवर निळ्या रंगाची एक आलिशान बीएमडब्लू गाडी उभी असल्याचे दिसते. तर गाडीच्या शेजारीच तरुण लघुशंका करत आहे. व्हिडीओ काढणाऱ्यांनी जेव्हा तरुणाला याबाबत जाब विचारला तेव्हा सदर तरुणाने अश्लिल हावभाव करून दाखवले. तसेच यावेळी गाडीत आणखी एक तरुण बसलेला दिसत आहे. ज्याच्या हातात दारूची बाटली दिसत असून तो व्हिडीओ काढा असे सांगत आहे.

या घटनेनंतर आता पुण्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वसंत मोरे, रुपाली ठोंबरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदर घटनेबद्दल संताप व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यामुळे पुण्यात काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या घटनेवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त केला. पुण्यात जे तरूण धुडगूस घालत आहेत, त्यांची सरळ धिंड काढा. ते कुणाची मुले आहेत, कोणत्या जाती-धर्माची आहेत, हे न पाहता त्यांना धडा शिकवला जावा, असे शिरसाट म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here