आज जागतिक महिला दिन आहे. सर्वत्र महिला दिनाचे कार्यक्रम होत आहेत. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महिला दिनाच्या निमित्ताने विरोधकांनी राज्यातील महिला सुरक्षावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
आज जागतिक महिला दिन असल्यामुळे प्रधानमंत्री मोदींनी दिल्लीत महिलांसोबत एक कार्यक्रम ठेवला आहे. यामधून आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत, आम्ही कसं महिलांची काळजी घेतो अशा प्रकारचे कार्यक्रम करून महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्धी दिली जाते. पण महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर गेल्या काही महिन्यात महिलांवर होणारे अत्याचार हे देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत. पोलिसांवर दबाव आणला जातो,” अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की,”लाडकी बहीण सारख्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत या भूमिकेत जर सरकार असेल तर सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करत आहे. या योजनेतही सरकारने बहिणींची फसवणूक केली आहे. निवडणुकीनंतर बहिणींना 2100 रुपये देणार होते. पण अजून 1500 रुपये हप्ता सुरू आहे. ही महिलांची फसवणूक आहे. असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.