पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू ठेवण्याचा मंत्री गुलाबराव पाटलांचा महिलांना सल्ला

आज राज्यभरात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. जळगावातही अशाच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा दाखला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू ठेवावा, असं त्यांनी म्हटलं.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

आज आपण बघतो की, महिलांच्या बाबतीत या सरकाने ज्या योजना राबवल्या त्यामध्ये बचत गट, एसटीचं हाफ तिकीट, मुलींचं मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना यांचा समावेश आहे. हे सगळं करत असताना आता महिलांनीदेखील पुढे येण्याची गरज आहे. तीच ढाल, तीच तलवार आणि तीच जबाबदारी तुला हाती घ्यायची आहे. शेळी नको मला तुझ्यात वाघीण बघायची आहे. असं चित्र महिलांमध्ये निर्माण झालं पाहिजे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“आपण कितीही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत असलो तरी राज्यात काही घाण घटना घडत आहेत, त्याकरता महिलांच्या पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि रामपुरी चाकू असला पाहिजे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: म्हणाले होते. त्यावेळेस पत्रकारांनी आणि इतर लोकांनी टीका केली होती. पण आज तीच वेळ आलेली आहे. आमच्या तरुण मुलींनादेखील माझी तीच विनंती आहे. स्वसंरक्षणाकरता तू अबला नाहीस तर तू लढणारी महिला आहे”, अशा पद्धतीने आपल्याला वागण्याची गरज आहे, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here