चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या फायनलची उत्कंठा आता शिगेला पोचलीय. आज अंतिम सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीने ४ सामन्यात २१७ धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यरने ४ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. शुभमन गिलने १५७ धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोललो तर मोहम्मद शमी संघासाठी अव्वल स्थानावर आहे. शमीने चार सामन्यांत ८ विकेट घेतल्या आहेत. तर वरुण चक्रवर्तीने २ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत.
सन २००० मध्ये या दोन्ही देशांमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचाच सामना पार पडला होता. त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता भारत २५ वर्षांनी हिशोब चुकता करणार का? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.