खळबळजनक! एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. ३२० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले असून सुरक्षा एजन्सींकडून त्याची तपासणी केली जात आहे.

आज मुंबई-न्यूयॉर्क (जेएफके) विमान प्रवासादरम्यान एआय११९ विमानात संभाव्य सुरक्षेचा धोका आढळून आला. यानंतर विमानातील प्रवाशांची सुरक्षा विचारात घेत आवश्यक प्रोटोकॉल नुसार विमान परत मुंबईला वळवण्यात आले, अशी माहिती एअर इंडियाच्या निवेदनात देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विमानाच्या शौचालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेली चिठ्ठी आढळून आली. या विमानात १९ क्रू मेंबर्ससह ३२२ प्रवासी प्रवास करत होते. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबई येथे सकाळी १०.२५ वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

या घटनेनंतर विमानाच्या पुढील उड्डाणीची वेळ बदलण्यात आली आहे, ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता हे विमान पुन्हा उड्डाण करेल. तोपर्यंत सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर मदत देण्यात आली आहे, असे एअरलाइनने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here