राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. यासह हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या युद्धाचं स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा अजित पवार यांनी केली.
अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मी घोषणा मी करतो.”
तसेच पुढे अजित पवार म्हणाले, दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.