भारतात २०५० पर्यंत २१.८ कोटी पुरुष आणि २३.१ कोटी महिला लठ्ठपणाच्या शिकार

२०५० पर्यंत भारतातील २१.८ कोटी पुरुष आणि २३.१ कोटी महिला लठ्ठपणाच्या शिकार असतील. एकूण ४४.९ कोटी किंवा लोकसंख्येच्या जवळजवळ एक तृतीयांश लोक लठ्ठपणानं त्रस्त असतील, असा इशारा लॅन्सेटच्या एका नवीन अभ्यासात देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर, २०५० पर्यंत सर्व प्रौढांपैकी अर्ध्याहून अधिक आणि मुले आणि किशोरवयीन मुलांपैकी एक तृतीयांश मुलं जास्त वजनाचे किंवा लठ्ठपणाचे बळी पडतील, असे अभ्यासात म्हटले आहे. तसेच तरुणांमध्ये, पुरुषांमध्ये जास्त वजन किंवा लठ्ठपणाचे प्रमाण १९९० मध्ये ०.४ कोटींवरून २०२१ मध्ये १.६८ कोटींवर पोहोचले आणि २०५० पर्यंत ते २.२७ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तरुण महिलांमध्ये ही संख्या १९९० मध्ये ०.३३ कोटी, २०२१ मध्ये १.३ कोटींवरून वाढली आहे आणि २०५० मध्ये ती १.६९ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

२०२१ मध्ये जगातील लठ्ठ आणि जास्त वजन असलेल्या प्रौढांपैकी निम्मे प्रौढ लोक भारतासह आठ देशांमध्ये राहत होते. अभ्यासात असे म्हटले आहे की, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लठ्ठपणाचे वाढते प्रमाण – बालपणातील सततचे कुपोषण आणि संसर्गजन्य रोगांमुळे होत आहे. अभ्यासात पुढे म्हटले आहे की, बालपणातील कुपोषणामुळे प्रौढावस्थेत लठ्ठपणा येतो, यामुळे टाइप २ मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि काही विशिष्ट कर्करोग यांसारख्या विकारांचा लवकर होण्याचा धोका वाढतो.

दुसरीकडे, मुलांमध्येही वाढत्या लठ्ठपणाची शक्यता आहे. भारतात मुलांमध्ये लठ्ठपणा आणि जास्त वजनाचे प्रमाण १९९० मध्ये ०.४६ कोटींवरून २०२१ मध्ये १.३ कोटींवर पोहोचले आणि २०५० मध्ये ते १.६ कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मुलींमध्ये १९९० मध्ये ते ०.४५ कोटींवरून २०२१ मध्ये १.२४ कोटींवर पोहोचले आहे आणि २०५० मध्ये ते १.४४ कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.

लठ्ठपणाच्या साथीचे एक प्रमुख कारण म्हणजे मीठ, साखर आणि चरबीयुक्त प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या सेवनात वाढ. २००९ ते २०१९ दरम्यान भारत आणि व्हिएतनाममध्ये प्रक्रिया केलेले अन्न आणि पेयांच्या विक्रीत सर्वात मोठी वार्षिक वाढ दिसून आली. असे अभ्यासात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here