काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आता यावर महायुतीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही दोन उपमुख्यमंत्र्यांना म्हणजेच एकनाथ शिंदे व अजित पवार यांना काय शुभेच्छा देणार? त्यावर पटोले म्हणाले, “त्या दोघांची गत फार वाईट आहे. आपल्या पक्ष टिकेल की नाही अशी त्यांची अवस्था आहे, किंवा त्यांच्या मनात भीती आहे. ही भारतीय जनता पक्ष त्यांना जगू देणार नाही. कारण भाजपची ती सवयच आहे. देशात त्यांनी जिथे-जिथे, ज्या-ज्या पक्षांबरोबर युती केली त्या सर्वांना भाजपने संपवून टाकलं. आता तुम्ही पाहतच आहात की भाजपने एकनाथ शिंदे यांच्या सर्व योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की आता एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी सतर्क व्हायला हवं. आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच.”
पटोले पुढे म्हणाले, “मी त्यांना होळीच्या शुभेच्छा देताना केवळ त्यांच्या सुरक्षेबद्दलची भूमिका मांडली आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं म्हटलं.” त्यावर पटोले यांना पुन्हा विचारण्यात आलं की सोबत आहात म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार की त्यांना तुमच्याकडे बोलवणार? या प्रश्नावर उत्तर देताना पटोले म्हणाले, “अर्थात आम्ही त्यांना आमच्याकडे बोलवणार. कारण आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. “
त्यानंतर पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. ते म्हणाले, “आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू. त्या दोघांचीही तशी इच्छा आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे आम्ही एकाला काही दिवस आणि दुसऱ्याला काही दिवस असं दोघांनाही मुख्यमंत्री करू”.