विराट कोहलीने आयपीएल २०२५ च्याच सुरूवातीला त्याच्या कसोटीमधील भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहली शनिवारी १५ मार्चला आयपीएलच्या १८व्या हंगामासाठी त्याच्या फ्रेंचायझी बेंगळुरूमध्ये सामील झाला. यावेळी फ्रँचायझीच्या एका कार्यक्रमात कोहलीने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याच्या अलीकडच्या फॉर्मबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोनशेहून अधिक धावा करणारा विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला होता. यावर प्रश्न उपस्थित केला असता, “मी कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळू शकणार नाही, त्यामुळे यापूर्वी जे घडलं जी कामगिरी मी करू शकलो, त्यात समाधानी आहे.” असं विधान त्याने केलं. त्यामुळे विराट कोहलीने निवृत्तीने संकेत दिले आहेत, असं म्हटलं जातंय.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अपयशानंतर कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर त्याची संघात निवड होईल का? निवड झाल्यास या मालिकेनंतरच निवृत्ती घेणार का? अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्याच, पण विराटच्या वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.