महायुतीत आले तरीपण वाद काही संपेना! धंगेकर विरुद्ध रासने संघर्ष

पुण्याच्या राजकारणामध्ये मागील दोन वर्षापासून मोठे बदल झाले आहेत. दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिव़डणूक झाली. या एका मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने अक्षरशः संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. यामध्ये हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी चुरशीची लढत झाली होती. रासने विरुद्ध धंगेकर अशा लढतीमध्ये पोटनिवडणूकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली. तर दीड वर्षात लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रासनेंनी भाजपचा गड पुन्हा मिळवला. अनेक नेत्यांनी महायुतीची साथ दिली. तर पुण्याचे कॉंग्रेसचे नेते असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. मागील आठवड्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यामुळे आता रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये आणि हेमंत रासने हे भाजपमध्ये आहेत. महायुतीच्या मित्रपक्षामध्ये असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप शत्रुत्व संपलेले नाही. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर बसल्यावरुन त्यांनी लक्ष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे.


माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी बॅनरवर लिहिले आहे.
यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत वादंग तसेच आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी राजकीय लढत आजही कसबामध्ये दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here