देवळालीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शिंदे गटात जुंपली!

देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील वाद दिवसागणिक वाढताना दिसत आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याची तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यास फारसा कालावधी लोटला नाही तोच भगूरमधील तलाठी कार्यालय उभारणीसाठी निवडलेल्या जागेवरून उभयतांमध्ये नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालय उभारणीसाठी निवडलेली जागा कोणाची, यावरून अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे आणि शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्यात वाद रंगला आहे.आमदार अहिरे यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी निधी मंजूर करुन आणला. अस्तित्वातील जागेवरील जीँर्ण इमारत पाडून नवीन मंडळ व तलाठी कार्यालय उभारण्यात येणार आहे. ही जागा भगूर नगर परिषदेच्या मालकीची असून ती तलाठी कार्यालयासाठी नियमबाह्य वर्ग केल्याची तक्रार शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांनी केली. भगूर नगरपरिषदेने ही जागा तलाठी कार्यालयास विनामूल्य उपलब्ध केली होती. ती भगूर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी आरक्षित आहे. प्रशासकीय राजवटीत जिल्हा प्रशासनाने ती शासनाची पूर्वपरवानगी न घेता, हरकती-सूचना न मागवता परस्पर महसूल विभागाच्या नावावर केली. याची चौकशी करून ही जागा पुन्हा नगर परिषदेच्या नावावर करावी आणि नवीन तलाठी कार्यालयाच्या बांधकामास स्थगिती देण्याची आग्रह शिंदे गटाने प्रशासनाकडे धरला आहे.

याउलट, आपण भगूरमध्ये कुठलेही काम करू नये, असे शिवसेना शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विकास कामांमध्ये वारंवार अडथळे आणले जातात, असा आरोप सरोज अहिरे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here