अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड सध्या भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. अमेरिकेत खलिस्तानवादी संघटना ‘शीख फॉर जस्टीस’ (SFJ) या संघटनेच्या भारतविरोधी कारवायांबाबत खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी राजनाथ सिंह यांनी केली. ‘शीख फॉर जस्टीस’ या संघटनेवर भारतात बंदी घातलेली आहे.
सदर बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या संचालक तुलगी गॅबार्ड यांना भेटून आनंद झाला. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान संरक्षण आणि माहितीची देवाणघेवाण यासंबंधी चर्चा झाली. राष्ट्रीय सुलक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल गॅबार्ड यांची भेट घेतल्यानंतर आज राजनाथ सिंह आणि गॅबार्ड यांच्यात बैठक पार पडली.
मागच्या वर्षी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल भारतीय नागरिक निखील गुप्ता विरोधात अमेरिकेने कारवाई केली होती. तसेच भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यालाही सहआरोपी केले होते. नोव्हेंबरमध्ये घडलेल्या या घडामोडीनंतर ही बैठक झाली आहे, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.