सध्या दिल्ली, मुंबई आणि पुण्याला वायू प्रदूषणाचा विळखा पाहायला मिळतोय. मुंबईत मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली आहे. त्यामुळं स्वाभाविकपणे प्रदूषणात वाढ होत आहे. वायू प्रदूषणामुळे मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या माणसांचा श्वास कोंडला जातोय. जगातल्या सगळ्यात जास्त प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आलीय. दिल्लीत हवा प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी देऊन ऑनलाईन शाळा घेण्याची वेळ आली होती. बाहेरून येणाऱ्या गाड्यांना बंदी घातली होती, कार्यालयाच्या वेळा बदलल्या होत्या.. इतकी बिकट अवस्था प्रदूषणाने केली आहे.
यावरून लक्षात येईल की प्रदूषण हा काही फक्त शाळेत शिकण्याचा विषय नाही. याकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं हे दिल्लीच्या परिस्थितीकडे बघून लक्षात येईल.
राजधानीतील हवेच्या घसरत्या दर्जाचा विचार व्हायला हवा. लवकरच महासत्ता वगैरे होऊ घातलेल्या देशाची राजधानी दिल्ली हे आपल्या देशातील बिघडत चाललेल्या वातावरणाचे एक ढळढळीत प्रतीक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सुधारणांद्वारे तयार केलेला पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे दंतहीन असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कलम २१ नुसार जगण्याचा अधिकार, शुद्ध हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. अशा स्थितीत सरकारांचे अपयश म्हणजे नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन आहे.
राज्यात ही फार चांगली परिस्थिती आहे असं नाही… महाराष्ट्रातील अनेक भागात वायू प्रदूषणही वाढत आहे. मुंबईत ही अनेक भागात हवेचा स्तर खालावलेला आहे.. मुंबईसारख्या महानगरात विविध कारणांमुळे वाढलेले वायू प्रदूषण नागरिकांसाठी ‘सायलेंट किलर’ बनत आहे. हृदय आणि फुप्फुसाशी संबंधित आजार या प्रदूषणामुळे बळावत चालल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे. आजच्या घडीला मुंबईमध्ये शहरीकरणाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे मुंबईची हवा अत्यंत प्रदूषित बनली आहे. श्वास घेणं अवघड होऊन बसलय.

अभिनय क्षेत्रासमवेत पर्यावरण आणि सामाजिक कार्यामध्ये हिरीरीनं पुढाकार घेणारी अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केलीय. दिया मिर्झानं आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढेच आपली आणि शहरातील समस्त माता, भगिनी, नागरिकांच्या वतीनं एक व्यथा मांडली. दियाची हतबलता तिनं लिहिलेल्या एक्स पोस्टमधून व्यक्त होत झाली. तिनं मांडलेल्या व्यथेशी सहमत होत याच मुद्द्याला नेटकऱ्यांनीसुद्धा दुजोरा दिला.
तिनं लिहिलं, ‘मुख्यमंत्री फडणवीसजी, मुंबई आणि महाराष्ट्रातील वायू प्रदूषणामुळं आमच्या मुलाबाळांच्या फुफ्फुसांवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मी एक आई म्हणून तुम्हाला विनंती आणि आवाहन करते की कृपा करून तातडीनं या मुद्द्यावर लक्ष द्या. ही एका पालकानं केलेली कळकळीची विनंती आहे..’
आपल्या या विनंतीपर आवाहनासोबत दियानं मुंबईचा एक नकाशाही जोडला. जिथं शहरातील हवेचा गुणवत्ता निदेशांक अर्थात AQI किती घसरला आहे हे स्पष्ट पाहता येत आहे. दियाची ही पोस्ट सोशल मीडियामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत असून, फक्त समस्त मुंबईकरांची हीच मागणी असल्याचं आता स्पष्ट होत आहे. प्रशासन यावर आता काय निर्णय आणि कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रदूषणाच्या समस्येकडे आपणच दुर्लक्ष केलं आणि निसर्गाची हानी केली, प्रदूषण होऊ नये यासाठी शासनाबरोबरच आपण प्रत्येकाने सुध्दा काही नियम पाळले पाहिजेत.. पण आपण सगळे नियम धाब्यावर बसवले. आता समस्या इतकी वाढली आहे की थेट आपली आरोग्यावर, रोजच्या जगण्यावर परिणाम करत आहे.
वायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले मुंबईकर मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न आता निर्माण झालाय.