नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना एकनाथ शिंदे उबाठा गटावर आक्रमक

नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत त्यांच्यावरही टीका केली. तसेच विधानपरिषदेतील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत आक्रमक होत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेत बोलत असताना माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच छळ झाला होता, असे म्हटले होते. पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. पण जसे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही, तसा मी पक्ष बदलला नाही, असे ते म्हणाले होते. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “तुमचा काय छळ झाला होता? तुमच्यावर कारवाई झाल्यानंतर तुम्हीही लोटांगण घातले होते, ही मला माहीत आहे. पण प्रकरणातून सुटका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नेत्यांप्रमाणेच पलटी मारली.”

एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले, “छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले. त्यांचे डोळे काढले, जीभ हासडली, कातडी सोलली, त्यावर मिठ चोळले, अशाप्रकारचे तुमच्यावर (विरोधक) अत्याचार झाले का? तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी युती तोडली. तसेच महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाच्या चार नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांचे आमदार फोडण्याचा तुमचा कट होता. पण मी युतीधर्मासाठी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी तुमचा टांगा पलटी केला. मी जे केले, ते उघडपणे केले. ज्याची जगातील ३३ देशांनी दखल घेतली. एकनाथ शिंदे कोण आहे, हे ३३ देशांमध्ये सर्च केले गेले.

दरम्यान, नागपूर दंगलीबाबत बोलत असताना त्यांनी विधानसभेत दिलेली माहितीच पुन्हा दिली. ही दंगल पूर्वनियोजित होती, असे प्रत्यक्षदर्शींकडून पुरावे मिळत असल्याचे ते म्हणाले. दंगल झालेल्या भागात एकेठिकाणी दररोज १००-१५० दुचाकी उभ्या असतात. मात्र दंगलखोरांची एकही दुचाकी काल त्याठिकाणी नव्हती. पेट्रोल बॉम्ब, लाठ्या, तलवारी इतक्या मोठ्या प्रमाणात अचानक कशा काय जमवल्या? यासाठी आधीच नियोजन केले गेले असावे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here