कोकणात ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. दापोलीचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय कदम आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सध्या दापोली मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही कदम आता पुन्हा एकत्र काम करणार आहेत. एकेकाळचे रामदास कदम यांचे उजवे हात असलेले माजी आमदार संजय कदम पुन्हा एकदा रामदासभाईंच्या नेतृत्वात स्वगृही परतणार आहेत. याचा मोठा फायदा दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघाचे उद्धव ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी मोठा विजय मिळवत गृहराज्यमंत्रिपदाला गवसणी घातली. तर शिवसेना ठाकरे गटाच्या संजय कदम यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता रामदास कदम आणि संजय कदम यांच्यातील राजकीय वाद आता मिटले असून शिमगोत्सवानंतर आता कोकणात राजकीय धुळवड पाहायला मिळत आहे.