युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांच्या संमतीने घटस्फोट झाल्याची माहिती वकिलांनी दिली. आज २० मार्च रोजी त्यांच्या घटस्फोटाची सुनावणी होती.
चहल आणि धनश्री दोघांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता गुरुवारी, २० मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाने दोघांचे घटस्फोटाचे अपील मंजूर केले आहे.
चहल आणि धनश्री २४ डिसेंबर २०२० रोजी विवाहबंधनात अडकले होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले, तर एकमेकांचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावरून डिलीट केले होते. त्यानंतर गेल्या महिन्यातच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्याचे समोर आले आणि आज २० मार्चला अखेरीस त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले आहे.