गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भातली घोषणा केली आहे. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
राम सुतार यांच्या पुरस्काराची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असं आहे. १२ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण २०२२४ या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. राम सुतार यांचं वय १०० वर्षं आहे. अजूनही ते शिल्प तयार करत आहेत. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली. दरम्यान, कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे.