मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार दाखल होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दरवाजाआड भेट झाली. दोघांमध्ये तब्बल ३० मिनिटे चर्चा चालली, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कुजबूज सुरु झाली आहे. जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या चर्चांना नव्याने बळ मिळाले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीकरत अजित पवार ८.१० वाजता बैठकीच्या ठिकाणी आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर तिथे जयंत पाटीलही पोहोचले. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची चर्चा आहे. या चर्चेवर अजित पवार म्हणाले, या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेकजण आहेत. त्यांनी काही मिटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितलं होतं. त्याकरता ५०० कोटींची तरतूद केल्याचंही जाहीर केलं होतं. यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. दोन बैठकांमध्ये थोडावेळ होता, म्हणून ती बैठक घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.
यापूर्वी जयंत पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, सातत्याने सुरू असलेल्या गुप्त बैठकींमुळे ते वेगळा निर्णय घेणार का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, सांगलीत अजित पवार यांच्या गटाला बळकट करण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील हे महत्त्वाचे ठरू शकतात.