नागपूरमध्ये झालेला हिंसाचार याबाबत गुप्तचर यंत्रणांचे अपयश असे म्हणता येणार नाही, पण अधिक चांगले इनपुट्स गुप्तचर यंत्रणा देऊ शकली असती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे माहिती ठेवण्यात कमी पडली, अशी कबुली राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पोलीस आयुक्तालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल-गांधीगेटसमोर औरंगेजबची प्रतिकात्मक कबर जाळली. कबरीवरील हिरव्या रंगाच्या चादरीवर आयत लिहिलेल्या होत्या, अशी संभ्रम निर्माण करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मुद्दामून पसरविण्यात आले. त्यामुळे सोमवारी दंगल घडली. ही दंगल घडण्यामागे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का? असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिवसभर सुरु असलेल्या या दंगलीबाबत पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला बरीच माहिती होती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही. मात्र, गुप्तचर यंत्रणा अधिक चांगली माहिती गोळा करु शकली नाही. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर असती तर कदाचित वेगळे चित्र असते, असे फडणवीस म्हणाले.