नागपुरात सोमवारी दोन गटात उसळलेल्या हिंसाचारात इरफान अन्सारी (३८, रा. गरीब नवाज नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. हिंसाचाराच्या दिवशी इरफानला जमावाने मारहाण केल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती, त्यानंतर आज त्याचा मृत्यू झाला. इरफानच्या मृत्यूनंतर, “पुढे असं कोणासोबतही घडून नये”, असं त्याचा भाऊ इम्रान सानी याने म्हटले आहे.
इरफान अन्सारीचा भाऊ इम्रान सानी म्हणाला की, “आम्ही त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला यश आले नाही, डॉक्टरांनी त्याच्यावर चांगले उपचार केले, पण ते त्याला वाचवू शकले नाहीत.”
तो पुढे म्हणाला की,”माझा भाऊ इरफान अन्सारी एका ऑटोने इटारसी जंक्शन रेल्वे स्थानकाला निघाला होता. त्यादरम्यान ऑटो चालकाने त्याला सांगितलं की, वातावरण चांगलं नसल्यानं पुढं जाणार नाही. त्यानंतर माझ्या भावाने रेल्वे स्थानकावर चालत जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर इतका जोरदार हल्ला केला की तो बेशुद्ध पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, पाय फ्रॅक्चर झाला, पाठीला दुखापत झाली. त्याच्यावर जमावाने हल्ला केला. या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. भविष्यात, कोणाबरोबरही अशी दुर्दैवी घटना घडू नये.”