महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या दिलों की धडकन असलेल्या पण वादग्रस्त नर्तिका गौतमी पाटीलचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलंय. महाराष्ट्रातील प्रस्थापित वर्गाचा या नाचगाण्यावर पगडा होता, त्याला गौतमी पाटीलने धक्का दिला असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसंच, गौतमी पाटीलविषयी विधानसभेत चर्चा झाली तेव्हा तिची बाजू घेणारा मी पहिला आमदार होतो, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे यांनी दिघा येथे गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गौतमी पाटीलने चांगल्या चांगल्यांना झोपवून स्वतःचं नाव केलं, त्यामुळे मला ती खूप आवडते. तिच्या नाचाबद्दल मला काही बोलायचं नाहीय. पण महाराष्ट्रातील प्रस्थापित वर्गाचा या नाचगाण्यावर पगडा होता, त्याला या मुलीने धक्का दिला. आमच्या विधानसभेतही हिच्यावर चर्चा झाली. अनेकजण तिच्याविषयी बोलले. पण मला आठवतंय मी पहिला माणूस होतो, ज्याने सांगितलं की एका गरीब घरातील मुलगी जर स्वतःच्या अदाकारीवर स्टेजवर पकड मिळवत असेल तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आता ती मोठ मोठ्यांच्या मागे उभी राहते. तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोण उभं राहिलं नव्हतं.”