देवेंद्र फडणवीस यांचा कुणाल कामराला इशारा

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठा इशारा दिला आहे. “तुम्ही स्टॅण्डअप कॉमेडी करा. मात्र, अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही”, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार? हे दाखवून दिलेलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्तराची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

“तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here