कुणाल कामराच्या कवितेवरून संजय राऊतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण!

कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारी कविता सादर केली. यामध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र यामुळे त्यांच्या पक्षातील आक्रमक कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. यामुळे हे प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. कुणाल कामराच्या मदतीसाठी ठाकरे गट धावून आला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार राऊत म्हणाले की, “आचार्य अत्रे यांची झेंडूंची फुले वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग होतंच असतं. नाही तर बाळासाहेब ठाकरे जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातील लोकांवर सर्वच टीका करतात. ती सहन केली पाहिजे. बाळासाहेबांनी आणि शरद पवार यांनी टीका सहन केली. अगदी विलासरावांनी देखील टीका सहन केली. मात्र मोदींचं सरकार आल्यापासून टीका सहन करायची नाही ही परंपरा पडली. आणीबाणीतही असं घडलं नाही. अशा टोकाच्या भूमिका कोणी घेतल्या नव्हत्या. फडणवीस यांनी तात्काळ दंगलखोरांवर कारवाई करावी. दंगलखोरांकडूनच रक्कम वसूल केली पाहिजे,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे संजय राऊत यांनी घडलेल्या हा प्रकार मुंबईमध्ये घडला असल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकास्त्र डागलं आहे. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहखातं चालवणं झेपत नाही, हे स्पष्ट दिसतं. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे. काय केलं त्यांनी? हा संपूर्ण कट दीड दोन तास आधी शिजला. काय करत होते मुंबईचे पोलीस. कुणाल कामराला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे कोण लोकं आहेत? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here