शिक्षक आणि पदवीधर आमदारांची पदे रद्द करण्याची मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली. त्यांच्या मागणीचे विधान परिषदेत जोरदार पडसाद उमटले. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी याबाबत माहिती देत त्यावर राज्य सरकारने भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. यावरून सभागृहात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. अखेर सभापती राम शिंदे यांनी सरकारने याविषयी निवेदन करण्याचे निर्देश दिले.
सभागृहामधील सदस्यांमध्ये शिक्षणाचा अभाव होता, तेव्हा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण करून त्यांचे प्रतिनिधी विधिमंडळात येत होते. आता तशी परिस्थिती राहिली नाही. उलट हे आमदार शिक्षक संघटनांना चुकीच्या गोष्टीत साथ देत आहेत. त्यामुळे नियमानुसार प्रक्रिया राबवून ही पदे रद्द करावीत. त्याऐवजी बचत गट, कामगारांमधून प्रतिनिधी घ्यावेत’, अस आमदार प्रशांत बंब म्हणाले. आमदार वंजारी यांनी बंब यांच्या वक्तव्यावर हरकत घेत, सरकारने यावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.