मुंबईतील काही मार्गावर बेस्टच्या बसला कमी प्रतिसाद आहे. या मार्गावरील बस कमी करुन गर्दी आणि मागणी असलेल्या मार्गावर देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. शहरातील अल्प प्रतिसाद असलेले बस मार्ग बंद करून त्यामार्गावरील बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे अल्प प्रतिसादाच्या मार्गांचा अभ्यास केला जात असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील असे सुमारे २० पेक्षा जास्त मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीसह भाडेतत्तावरील बसही आहेत. भाडेतत्वावरील बसला प्रवाशांसह, वाहतूक तज्ञांसह, कामगार-प्रवासी संघटनांचा विरोध आहे. तरीदेखील बेस्टने भाडेतत्वावरील बसची संख्याच वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या मार्गावर बसेस प्रमाण वाढणार आहे. यामुळे बेस्टच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होण्यास मदत होईल. गेल्या वर्षी 23 मे रोजी 2,100 इलेक्ट्रिक सिंगल डेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट बेस्ट उपक्रमाने निविदा प्रक्रिया राबवून एका मोठ्या कंपनीला दिले होते. यातील सुमारे 450 बस ताफ्यात आल्या आहेत. सध्या बेस्टचा एकूण ताफा हा 2 हजार 800 पर्यंत आहे. डिसेंबर 2024 मध्ये बेस्टकडे 3 हजार 175 बस होत्या. कमी ताफ्यामुळे प्रवाशांची बस थांब्यावरील प्रतीक्षा वाढली आहे. त्यातच आयुर्मान संपल्यानंतर नोव्हेंबर 2025 पर्यंत बेस्टच्या मालकीच्या साध्या 700 बसही भंगारात काढल्या जाणार आहेत.
प्रवासी संख्या कमी असलेले २० पेक्षा जास्त मार्ग बंद करण्याचा विचार सुरू असून सध्या त्याचा अभ्यास सुरू आहे. तर एक ते दोन तासांचा अंतरावर प्रवास करणारे प्रवासीही अल्पच असून हे मार्गही बंद करण्याचा विचार आहे.