लोकसभेत काल इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, २०२५ मंजूर करण्यात आले आहे. यानंतर लोकसभेत झालेल्या चर्चेत भाग घेताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शाह म्हणाले की, पर्यटक म्हणून किंवा शिक्षण, आरोग्य सेवा आणि व्यवसायासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागत करण्यास सरकार तयार आहे. पण जे धोका ठरू शकतात अशा लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
सरकार फक्त अशाच लोकांना रोखेल ज्यांचा भारताला भेट देण्याचा हेतू दूषित आहे. याबरोबरच त्यांनी देश हा धर्मशाळा नाही असेही वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केले. “राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरतील अशांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. देश म्हणजे ‘धर्मशाळा’ नाही. जर कोणी देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी देशात येत असेल तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे,” असेही शाह यावेळी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की प्रस्तावित कायदा हा देशाच्या सुरक्षेला बळ देईल आणि यामुळे अर्थव्यवस्था आणि उद्योगांना बळ मिळेल. याबरोबरच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला देखील प्रोत्साहन मिळेल. तसेच इमिग्रेशन विधेयकामुळे भारत देशात येणाऱ्या प्रत्येक विदेशी व्यक्तीची ताजी माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.