गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा दिवस आता दोनच दिवसांवर येऊन उभा आहे. त्याआधी सोन्याच्या दरांनी महागाईची गुढी उभारली आहे, ज्यामुळे मराठी नवीन वर्षाआधीच ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. जागतिक तसेच देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कमी होण्याची चिन्हेच दिसत नाही. गुरुवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरांनी ९१,००० रुपयांची पातळी ओलांडली आणि यामुळे आता ग्राहकांना प्रति १० ग्रॅम खरेदीसाठी ९१,०५० रुपये मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली असून पुढेही दरवाढीचा ट्रेंड सुरु राहील असा विश्लेषकांचा अंदाज आहे. यामागची प्रमुख करणे म्हणजे की सर्वप्रथम जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता कायम आहे तर, अनेक देशांमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तसेच भू-राजकीय तणाव वाढत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे व्यापार युद्धाचा धोकाही वाढला आहे.
या वर्षी सोन्याच्या किमतीत आतापर्यंत १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यापार धोरणांमुळे आर्थिक तसेच भू-राजकीय चिंता निर्माण झाल्या, ज्यामुळे सोन्याची मागणी सतत वाढत आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये अचानक बदल आणि विलंब झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने अधिक आकर्षक बनले आहे. दुसरीकडे, गोल्डमन सॅक्सनेही मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या मागणीचा अंदाज वाढवला. अमेरिकेच्या धोरणांबाबत अनिश्चितता असताना आणि चीन देखील सतत सोने खरेदी करताना, यामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात. तसेच चीन पुढील ३ ते ६ वर्षे सोने खरेदी करत राहील असा गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे.