गुढीपाडव्याचे निमित्त साधून नागपुरात येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपने केली आहे. मोदी तब्बल १२ वर्षांनंतर रेशीमबागेतील स्मृतिमंदिरास भेट देणार आहेत. तिथे भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरतील. त्यामुळे संघ स्वयंसेवकांमध्येही उत्साह संचारला आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी १६ सप्टेंबर २०१२ रोजी नरेंद्र मोदी स्मृतिमंदिरात गेले होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या अंत्यदर्शनासाठी ते आले होते. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच, मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व अन्य नेते आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात मोदी यांचा दौरा ऐतिहासिक मानला जात आहे. माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. संघाच्या निमंत्रणावरून ते येत आहेत. आमगनानंतर ते थेट रेशीमबागेत जातील.
भाजपचे भिन्नभिन्न मोर्चे, आघाड्यांकडून चौकाचौकांत विविध राज्ये, संप्रदायाच्या परंपरेनुसार वेशभूषा करून स्वागत केले जाणार होते. पण ऐनवेळी नियोजनात मोठा बदल करण्यात आला आहे. पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे जोरदार सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. सुमारे 5000 पोलीस ठीकठिकाणी बंदोबस्तात तैनात राहणार आहे. पंतप्रधान यांचा ताफा ज्या चौकामधून जाणार आहे, त्यापैकी काही चौक पोलिसांनी निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भाजपने 47 चौकांवर स्वागताची तयारीचे नियोजन केले होते, मात्र आता त्यात बदल करावे लागणार आहे. कारण पोलिसांनी काही चौक निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे किती आणि कोणत्या चौकांमध्ये स्वागत करावं, हे पोलिसांच्या निर्णयानंतर ठरेल. ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वागत होईल, त्या त्या ठिकाणी भगव्या आणि हिरव्या रंगाची म्हणजेच भाजपच्या झेंड्याची थीम स्वागतासाठी वापरली जाणार आहे. गुढीपाडवा असूनही जवळपास 15,000 भाजप कार्यकर्ते ठीकठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहतील. अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली आहे.