गेल्या काही दिवसांपासून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान प्रतापगढी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधातील अशाच एका प्रकरणाची सुनावणी चालू होती. यादरम्यान, न्यायालयाने व्यंगात्मक विनोद सादर करण्यासंदर्भातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भूमिका मांडली.
“जरी एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार बहुसंख्य व्यक्तींना अवडले नाहीत, तरी त्या व्यक्तीच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण व आदर व्हायलाच हवा. कोणतंही साहित्य, मग ते कविता, नाट्य, चित्रपट व्यंग किंवा कला असो, त्यातून मानवाचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होत असतं”, असं खंडपीठाने म्हटलं.
दरम्यान, सविस्तर प्रकरण असं आहे की, ३ जानेवारी रोजी प्रतापगढींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी एका सामुहिक विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यासंदर्भात त्यांनी एक गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. ‘ए खून के प्यासे बात सुनो’ हे गाणं चालू असलेला एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता. अशा पोस्टमधून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान दिलं गेल्याचा, तसेच धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रतापगढींच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.