संजय राऊत यांनी केली अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आणि एकनाथ शिंदेंना दिला खोचक सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कर्जमाफी संदर्भात एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” यावरुन आता संजय राऊत यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि एकनाथ शिंदेंना खोचक सल्लाही दिला आहे.

“अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीची भाषा, तसंच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भाषा वेगळी होती. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच. ‘च’वर जोर देऊन हे तिन्ही नेते बोलत होते. आता अजित पवारांनी हात वर केले आहेत. अजित पवार कर्जमाफी करु शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रातल्या वचनभंग केल्याबद्दल नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

तर पुढे एकनाथ शिंदेबद्दल बोलताना, “एकनाथ शिंदेचं वक्तव्य मी पाहिलं. काहीही झालं तरी वचन पूर्ण करणार म्हणाले. जेव्हा अजित पवार आणि त्यांच्या पक्षाने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ कर्जमाफी देऊ या घोषणा केल्या तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे होते. त्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदेंची जास्त आहे. एकनाथ शिंदे वचन पूर्ण कसं करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाही म्हणत आहेत. एकनाथ शिंदेंनी एक करावं जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देत नाहीत तोपर्यंत मी देवगिरी बाहेर उपोषणाला बसेन अशी भूमिका घ्यावी. लाडके भाऊ आहेत ना? मग त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलं पाहिजे. प्राण जाए पर वचन न जाए हे करुन दाखवलं पाहिजे. मराठा माणसाची, शिवसैनिकाची ही भूमिका असते. एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांसमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्यांना गंडवलं जातं आहे तुम्ही काय करत आहात? सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा. शिवसैनिक असाल तर शिवसेनेचा खरा आत्मा हा आंदोलन आहे.” असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here