आज नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे. मात्र बाजाराची सुरूवात घसरणीने झाली. बीएसई आणि निफ्टी या दोन प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्याहून अधिकची घसरण झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिलपासून जगातील सर्व देशांवर टॅरिफ लागू करणार आहेत. त्यामुळे बाजारावर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून आले. सर्वाधिक घसरण आयटी स्टॉक्समध्ये दिसून आली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स १,१०६.२३ अंकांनी घसरून ७६,३०८.९२ पर्यंत खाली आला. तर निफ्टीमध्ये २४३.२५ अंकांची घसरण होऊन निर्देशांक २३,२७६.१० वर खाली आला.
बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य ३ लाख कोटी रुपयांनी घसरले. वित्त, बँक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांक २ टक्क्यांनी तर निफ्टी बँक निर्देशांक १.५ टक्क्यांनी खाली आला. बजाज ट्विन्स, बजाज फिन्सर्व्ह, श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसमध्ये मोठी घसरण दिसून आली.