गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाच्या अहवालावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल म्हणजे, “स्वत:लाच क्लिन चिट देण्याचा प्रयत्न, त्याला महत्त्व नाही”, असे म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “या प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या अधारे संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वत:चाच एक चौकशी अहवाल सादर केला आहे. पण, त्याला काही इतके महत्त्व आणि गांभीर्य नाही. कारण हा स्वत:लाच क्लिन चिट देण्याचा प्रकार या रुग्णालयाच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र, राज्य सरकारची जी चौकशी समिती आहे तिचा अहवाल सोमवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तांच्या समोर सादर केला जाणार आहे.”