माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातला वाद पुन्हा समोर आला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान गिरीश महाजन याला सडेतोड प्रत्युत्तर देत म्हणाले मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला लोक जोड्याने मारतील.
भाजपाचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. तसंच आपल्याला त्या महिला अधिकाऱ्याचे नाव देखील माहिती असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांना भेटून यासदंर्भात विचारणा करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर गिरीश महाजन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली त्याची माहिती देखील त्यांनी या त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र ते नाव सांगणं योग्य ठरणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शाहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते.अमित शाह यांनी गिरीश महाजन यांना सांगितले की, तुझे एका महिला आयएस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत, परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की, नाही माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांसोबत बोलणं सुरू असते. पण, शाहांनी त्यांना सांगितले की, तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर-शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यांसह झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले आहे”, असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ज्यानंतर गिरीश महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हे सगळे आरोप फेटाळत थेट एकनाथ खडसेंनाच आव्हान दिलं आहे.
“मी जर एक गोष्ट सांगितली तर एकनाथ खडसे घराबाहेर पडल्यावर लोक त्यांना जोड्याने मारतील. माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी कधीही कुणालाही तोंड दाखवणार नाही. तसंच जे काही आहे ते लोकांना दाखव फालतू बडबड करु नको अशा पद्धतीने त्यांनी एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेखही केला. मी यांना दिलं, मोबाइलमधे होते, मोबाइल हरवला लाज वाटते का खोटं बोलताना. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टींचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळं करुनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही. एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला आहे, त्यातून हा विषय झाला आहे.” असं उत्तर गिरीश महाजन यांनी दिलं आहे.