शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पक्षात येण्याची अधिकृत ऑफर दिली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आमच्या पक्षाचे दरवाजे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी कायम उघडे असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
“शिवसेना ठाकरे गटाचे जे वाचाळवीर आहेत त्यांना माझा सल्ला आहे की तु्म्ही दुसऱ्यांचा चांगुलपणा करण्यापेक्षा जय श्री रामाचं नाव घ्या, तुमचं काहीतरी चांगलं होईल. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबाबत मला कधीही राग नाही. कारण त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. त्यामुळे मी काल देखील सांगितलं की अशा माणसांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे आहेत. इतरांसाठी नाही, मी त्यांना पक्षात येण्याची अधिकृत ऑफर दिली आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.