राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य सादर केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली. तसेच, पोलीस आणि तक्रारकर्ते व शिवसेना आमदार मुरजी पटेल यांना न्यायालयाने नोटीस बजावून कामरा याच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
कामरा याच्या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी तातडीची सुनावणी झाली. त्यावेळी, प्रतिवादींना (पोलीस आणि पटेल) नोटीस द्या व त्यावर ते सूचना घेतील आणि उत्तर सादर करतील, असे स्पष्ट करून न्यायालयाने सुनावणी १६ एप्रिल रोजी ठेवली.
तत्पूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी कुणाल कामराला दिलेले अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण १७ एप्रिलपर्यंत वाढवले असल्याची माहिती कामराच्या वतीने वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्यायालयाला दिली. दुसरीकडे , कामरा हा सध्या तमिळनाडूमध्ये आहे. २०२१ पासून ते तिथे वास्तव्यास आहे. या प्रकरणामुळे याचिकाकर्त्याच्या जीवाला धोका आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे (व्हिसी ) चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी तीन वेळा पोलिसांकडे लेखी स्वरूपात मागण्यात आली. परंतु अद्याप त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही.
हा खूनाशी संबंधित खटला नाही. हा एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून दाखल केलेला एफआयआर आहे. त्यासाठी कामरा व्हिसीद्वारे चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु, पोलीस अधिकारी कामराचा जबाब नोंदवण्यासाठी नव्हे तर त्याला प्रत्यक्षरित्या मुंबईत आणण्यास अधिक उत्सूक आहेत, असा दावाही सेरवाई यांनी केला. त्यांचा युक्तिवाद थोडक्यात ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणीला सर्व मुद्द्यांवर विचार केला जाईल, असे स्पष्ट करून न्यायालयाने प्रतिवाद्याना नोटीस बजावली आणि सुनावणी तहकूब केली.