राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या चिरंजीवाचा साखरपुडा काल पार पडला. जय पवार आणि फलटण येथील उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा काल संपन्न झाला. हा सोहळा पुण्यातील घोटावडे येथे स्थित फार्महाऊसवर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता . या खासगी आणि पारंपरिक पद्धतीने झालेल्या सोहळ्याला पवार कुटुंबातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या समारंभाला शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, प्रतापराव पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. तसेच काही निवडक आणि खास आमंत्रितांनाच या साखरपुड्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भव्य विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीमुळे सोहळ्याला खास आकर्षण लाभले होते. जय पवार आणि ऋतुजा पाटील या दोघांनीही पांढऱ्या रंगाचे पोशाख परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव असून त्यांचा कल उद्योग व्यवसायाकडे आहे. दुबईमध्ये काही काळ व्यवसाय केल्यानंतर सध्या ते मुंबई आणि बारामती येथे विविध व्यवसाय सांभाळत आहेत. मात्र, त्याचवेळी ते राजकारणातही सक्रिय दिसून येतात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती मतदारसंघात प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी वडील अजित पवार यांच्यासाठीही प्रचार केला होता. राजकारणात पवार कुटुंबात दोन गट पडले असले तरी हा साखरपुडा सोहळा पवार कुटुंबासाठी एक खास क्षण ठरला.