अहिल्यादेवींच्या जयंतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निमंत्रण देणार नाही अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी हा सरकारी कार्यक्रम नसल्याचा युक्तिवाद केला आहे. मात्र तरीही त्यांच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300 व्या जयंतीनिमित्त तब्बल 50 हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे. पुण्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे. अमित शाह यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. कोणाकोणाला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं हेही त्यांनी सांगितलं. मात्र यात अजित पवारांचं नाव त्यांनी घेतलं नाही. याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपण अजित पवारांना बोलावणार नसल्याचं स्पष्ट केलं.