अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव वाढत असतानाच, अमेरिकेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या एका अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात व्हिसा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थी भारतीय होते. एकूण ३२७ प्रकरणांच्या चौकशीत हे धक्कादायक सत्य समोर आले असून, भारत सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे.
या अहवालानुसार, भारतीय विद्यार्थ्यांनंतर चीनमधील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला, जिथे १४ टक्के विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिकजण OPT (Optional Practical Training) या कार्यक्रमाअंतर्गत होते, म्हणजे त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते आणि अमेरिकेत कायदेशीररित्या काम करत होते. ट्रम्प प्रशासनाने विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यामागे एक प्रमुख कारण म्हणून राजकीय निषेधामध्ये सहभागी होणे असे कारण दिले होते. परंतु AILA च्या तपासणीतून समोर आले की फक्त दोन विद्यार्थ्यांचाच अशा निषेधांशी प्रत्यक्ष संबंध होता.हे पाहता, राजकीय कारणांवरून व्हिसा रद्द करणे हे अत्यंत अपारदर्शक आणि पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप वकिल संघटनेने केला आहे.
AILA ने जोरदार मागणी केली आहे की, भविष्यात अशा प्रकारची कारवाई करताना पारदर्शकता, जबाबदारी आणि अपीलची सोपी प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी. या घटनेवरून भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेताना किती अनिश्चिततेचा सामना करावा लागतो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. भारतीय विद्यार्थ्यांवर अत्यंत मोठा परिणाम झालेला असताना, ट्रम्प प्रशासनाने घेतलेली ही भूमिका फार काळजीपूर्वक आणि जागरूकतेने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. भविष्यात अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अधिक चोख माहिती, मार्गदर्शन आणि कायदेशीर सुरक्षा यांची आवश्यकता भासणार आहे.