लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन, त्रिशा कृष्णन आणि सिलंबरासन टी. आर. उर्फ सिम्बू हे त्यांचा आगामी चित्रपट ‘ठग लाइफ’ ला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटाचं ते प्रमोशन करत आहेत. अशात एका मुलाखतीत सुत्रसंचालकानं सगळ्यांना लग्नाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी विचारलं. त्रिशानं उत्तर दिलं की माझा लग्नावर विश्वास आहे. जर लग्न झालं तर ठीक आहे, जर नाही झाली तरी ठीक आहे. तर हाच प्रश्न कमल हासन यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी एमपी जॉन ब्रिटास यांच्यासोबत झालेल्या घटनेचा उल्लेख केला.
कमल हासन यावेळी म्हणाले की, “ही 10-15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक चांगला मित्र आहे, खासदार जॉन ब्रिटास. त्यानं एकदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर मला विचारलं, ‘तू एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबातून आला आहेस, तरी तू दोनदा लग्न कसं केलंस? मी म्हणालो, चांगल्या कुटुंबातून असणं आणि लग्नाचा काय संबंध आहे? त्यानं सांगितलं की नाही, पण तू प्रभू रामची पूजा करतोस. त्यामुळे त्यांच्या मार्गावरच चालायला हवं. त्यावर उत्तर देत मी म्हणालो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोणत्याही देवाची पूजा करत नाही. मी रामाच्या वाटेवर नाही चाललो, कदाचित त्याच्या वडिलांच्या म्हणजे राजा दशरथ यांच्या मार्गावर चाललो असेन.