राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी आशा आता कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे कारण राज यांच्या निमंत्रणाला उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. तुम्ही शिवाजी पार्कवरील कॅफे असा उल्लेख करता, त्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर जाऊन ठाकरे गट युतीची चर्चा करणार का, असा प्रश्न संजय राऊतांना करण्यात आला. यावर संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला काय वाटते की, आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर बोलत नाहीत का? मग का जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. मला सांगा त्यात अट आणि शर्त कोणती? कोणतीही नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की, महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हेही महाराष्ट्राच्या हितासाठीच म्हणत आहेत. मग प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजपा बसत नाही. ही अट नाही, तर लोकभावना आहे. हा विषय विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.