काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २७ पर्यटकांपैकी ६ पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवलीमधील ३, पुण्यातील २ आणि पनवेलमधील एका पर्यटकाने या हल्ल्यात प्राण गमावले आहेत. काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची घरी परत येण्यासाठी धडपड सुरु असतानाच सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असं असतानाच सध्या श्रीनगरमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे ठाणे मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या एका विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं कौतुक करताना नेमकं असं काय म्हटलं आहे त्यामुळे वाद निर्माण झाला आहे पाहूयात.
एकनाथ शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना खासदार म्हस्केंनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर काही आकडेवारी मांडली. “सरकार जबाबदारी समजून मदत करत आहे. घेऊन शिवसेनेतर्फे, एकनाथ शिंदेंतर्फे पाठवण्यात आलेलं विमान काल ज्येष्ठ नागरिक, महिलांचा समावेश असलेलं 75 पर्यटकांना घेऊन पोहोचलं. आता दुपारी 185 प्रवासी घेऊन एक विमान येणार आहे. रात्री सुद्धा 185 प्रवासी असलेलं विमान येणार आहे,” असं म्हस्के पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.
पुढे बोलताना म्हस्केंनी, “तुम्हाला माहित आहे का? त्यामध्ये 45 प्रवासी असे आहेत जे वर्धा आणि नागपूरचे आहेत. ते रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. हे असे 45 लोक आहेत जे कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. तुम्हाला मिर्चा झोंबतात? काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान आणि आयएसआयचं नरेटीव्ह चालवण्याचं काम संजय राऊतांनी केलं,” असं विधानही केलं. या विधानावरुनच आता म्हस्केंवर टीका केली जात आहे.